Saturday, July 01, 2006

किल्ले तोरणगड

गेले दोन - अडीच महीने सलग काम केल्यावर आत्ता कुठे सुट्टी (म्हणजे कमी काम) चालू झाली आहे.... आणि सुट्टीची सुरुवात परत एकदा एका झकास ट्रेकनी केली आहे.
आत्ताच मी तोरण्यावर चढाई करून परत येत आहे!! दिवसभर पावसात अगदी नखशिखांत चिंब भिजल्यावर आत्ता कुठे कोरड्या कपड्यांची आणि गरम गरम खाऊ आणि कॉफीची ऊब जराशी अंगात मुरायला लागली आहे. आणि मी ट्रेक परत एकदा अनुभवायला लागलिये...

कालपर्यंत आज ट्रेकला जायचं क नाही हे नक्की नव्हतं (नेहमीप्रमाणेच)... पण शेवटी एकदा आज बाहेर पडायचं हे नक्की झालं. आज सकाळी घड्याळानी पण दगा दिला आणि गजर वाजलाच नाही...पण जाणं जमायचंच होतं बहुतेक, त्यामुळे निघायचं ठरलेल्या वेळेच्या आधी ५ मिनिटं जाग आली...मग सुपरफास्ट वेगानी आवरलं आणि आमची स्वारी बाहेर पडली.
दिवसभरात काय करणार आहोत याची झलक पुण्यातंच स्वारगेटला जाईपर्यंत भिजून मिळाली. ५ डोक्यांपैकी फक्त ३ डोकी उगवली होती. मग बस लागल्यावर त्या दोघांसाठी न थांबता आम्ही पुढे निघालो. पुढच्या बसनी बाकी लोक पण(म्हणजे २ जण) १० ला वेल्ह्याला आले. नाश्ता करून आम्ही गड चढायला लागलो.
ट्रेक आहे आणि रस्ता चुकला नाही असं कधी होणं शक्य आहे का? आणि रस्ता न चुकता झाला तर तो ट्रेक कसला?
तर रस्ता चुकण्याचा नियम पुरा करत आम्ही भलतीकडेच गेलो....आणि मग भलत्याच वाटेनी भर पावसात दिव्य करत अचानकपणे मुख्य वाटेला लागलो. मग मात्र रस्ता चुकायला फारसा वाव नसल्यानी आम्ही सरळ सरळ चालत मोठ्या चढणी पार केल्या.

आणि अचानकपणे समोर एक भव्य असा धबधबा आला.... एकदम उंच आणि गार असा धबधबा होता तो! पाण्याला वेग तर भयंकरच होता. थोडा वेळ या धबधब्यात डुंबुन झाल्यावर आम्ही परत पुढे चालायला लागलो. आता सगळा दगडी टप्पा होता. चढताना फार त्रास नाही झाला पण या वाटेवरून नंतर परत उतरायचं आहे हे मात्र राहुन राहुन डोक्यात येत होतं.
शेवटी एकदाचे वर गडावर पोचलो. वरचं तोरणाईचं मंदिर नुकतंच बांधून काढलं आहे. त्यामुळे जेवेपर्यंत घोंघवणारा वारा आणि धो धो पडणारा पाऊस यांना अडवणारा एक उत्तम आडोसा मिळाला.
एव्हाना भिजल्याचं काहीच वाटेनासं झालं होतं. पण पोटात अन्न गेल्यावर मात्र थंडी वाजायला लागली. आणि काढून ठेवलेले ओले बूट-मोजे आणि जर्किन्स घालायचं जिवावर यायला लागलं. शेवटी एकदाचा सगळा जामानिमा परत चढवून उतरायला सुरुवात केली.
चढताना वाटलं होतं तेवढं उतरणं अवघड नाही गेलं. मात्र दगडी टप्पा ओलांडून खाली पोचल्यावर मात्र सोसाट्याचा वारा म्हणजे काय त्याचं चांगलंच प्रात्यक्षिक पहायला मिळालं. मी तर उडून जाता जाता राहिले!!!
हे सगळे टप्पे इमानेइतबारे पार पाडल्यावर शेवटचा टप्पा होता ते म्हणजे एक ओढा पार करायचा... भरपूर पाणी आणि थोडीशी ओढ असलेला हा ओढा पण पार केला आणि दिवसाभराचं काम संपलं!!
मग बसची वाट न बघता जीपनी हायवे पर्यंत आलो. तिथे पण आमच्यासाठीच आल्यासारखी एस.टी. येउन थांबली आणि आमच्या स्वाऱ्या तोरण्यावरची चढाई यशस्वी करून पुण्याला परतल्या.