Thursday, March 09, 2006

सुख सुख म्हणतात ते हेच!

आज सकाळ्पासून हवा खूप सुंदर आहे. ढगाळ, पावसाळी वातावरण आहे. वारं पण आहे.....गाडीवरून भटकायला लई मज्जा आली..आणि पावसाच्या आवाजात खिडकीतून बाहेर पाहत लेक्चर करायला पण......

आत्ता बाहेर पाउस पडतोय!!!! आणि मी वाफाळत्या चहाचा कप घेऊन खिडकीत उभी आहे...

अशा छोट्या छोट्या क्षणांपेक्षा आणखी काय पाहिजे सुखी असायला ???

Tuesday, March 07, 2006

मुक्काम हरिश्चन्द्रगड!

हा शनिवार- रविवार एक झकास ट्रेक झाला. झटकन ठरवून, पटकन जाऊन आलेल्या आणि सुरेख जमलेल्या थोडक्या सहलींपैकी हा ट्रेक एक होता!
आम्ही शनिवारी दुपारी प्रवासाला सुरुवात केली. पुण्याहून आळेफाटा, तिथून जीपनी खिरेश्वर, आणि मग चढाईला सुरुवात....
हिरव्यागर्द झाडीतून जाणारी वळणावळणाची वाट वर चढायला कधी लागली कळलंच नाही. दाट जंगलातून जाणारी वाट पार करत करत तोलारखिंडीत पोचलो. व्याघ्रेश्वराचं दर्शन घेऊन पुढची वाटचाल सुरु केली.शेवटी वाटेतल्या सर्वात अवघड टप्प्यावर म्हणजे रॉकपॅचवर पोचलो....एव्हाना अंधार झाला होता. चंद्रप्रकाश अनपेक्षित पणे पुरेसा होता. त्या प्रकाशात चढायला धमाल आली....
सगळ्या आवाजांपासून, प्रदूषणापासून लांब, चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली खूप मोकळं वाटत होतं.. टिपूर चांदण्यात चढायला मजा येत होती. वर अर्धा तासाचं सरळ चालणं कंटाळवाणं झालं होतं. आणि कधी एकदा मुक्कामी पोचून पडी टाकतोय असं वाटत होतं......पण वर पोचून १० मिनिटं बसल्यावर सगळा शीण पळून गेला. त्यात गरमागरम भाकरी, पिठलं आणि भात खाल्यावर तर मस्तच वाटलं. मग मस्त ताणून दिली.
सकाळी कोकणकडा पहायला गेलो. शब्दात वर्णन करणं अवघड आहे. स्वत: पाहिल्याशिवाय त्याची भव्यता लक्षातच नाही येणार...
परतीचा प्रवास पण मस्त होता. एस.टी. मधे घसा फाडून गाणी गायलो. शेवटी लोक ओरडल्यावरच गप्प बसलो. :D
खूप दिवस हवा तसा ब्रेक हवा तसा ट्रेक करुन मिळाला आहे. खूप वारा पिऊन, मनसोक्त हुंदडून, गाणी गाऊन आता परत रोजच्या दिनक्रमाला सुरुवात नव्या दमानी झाली आहे!

Thursday, March 02, 2006

श्रीगणेशा!

बरेच दिवस लिहीन म्हणत होते, पण आज शेवटी मुहुर्त लागला. नियमित लिहायची इच्छा आहे. बघू किती जमतंय! :)